RAANTANTRA

मातीतली अन्नसाखळी (Soil Food Web)


(माहिती स्रोत: इंटरनेट)

२००६ मधे Elaine Ingham एलेन इंगहॅम ह्यांनी soil food web (मातीतली अन्नसाखळी) ही संकल्पना मांडली व तिचा जगभर प्रसार केला. वाळू (Sand), गाळ (silt) आणि चिकणमाती (clay) हे जगातल्या कोणत्याही मातीत कमीअधिक प्रमाणात असलेले हे मूलभूत घटक. दगडाची निरनिराळ्या कारणांमुळे सतत झीज होत असते, ज्यापासून हे कण तयार होतात. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला आवश्यक असलेले धातू (metals) पुरेशा प्रमाणात, दगडात आणि पर्यायाने ह्या कणांमध्ये उपलब्ध असतात. तेही जगातल्या सर्व प्रकारच्या मातीत. परंतु हे धातू खनिज स्वरूपात असताना वनस्पती आणि इतर सजीवांना ते शोषून घेता येत नाहीत. पृथ्वीवर सर्वात आधी उत्क्रांत झालेले सूक्ष्मजीव विविध उत्प्रेरकांच्या (enzyme) च्या साहाय्याने गुंतागुंतीच्या अनेक रासायनिक प्रक्रिया करतात. ह्या प्रक्रियांमुळे खनिजांपासून मुक्त होऊन धातू मोठ्या सेंद्रिय संयुगांना जोडली जातात. ह्या प्रक्रियेला किलेशन (Chelation) म्हणतात. ह्यानंतर हे धातू विद्राव्य न राहता, जैवसाखळीतील इतर सजीवांना उपलब्ध होतात.

वनस्पतींच्या मुळांभोवती बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोआ, नीमॅटोडस्, अमिबा, अल्गी सारखे सूक्ष्मजीव ते बुरशी, गोम, खेकडे, बेडूक, कोंबडी, उंदीर ह्यासारख्या बहुपेशीय जीवांपर्यंत एक जैवसाखळी मातीमध्ये असते. ह्या सर्व सजीवांच्या जगण्या मरण्यातून, हालचालींतून आणि चयापचय क्रियांमधून जिवंत मातीत सतत वेगवेगळ्या जैवरासायनिक क्रिया घडत असतात. विविध मूलद्रव्यांचं एका जीवाकडून दुसऱ्याकडे, तिथून तिसऱ्याकडे मग पुन्हा पहिल्याकडे अशाप्रकारे चक्र चालत राहतं. परस्परांवर अवलंबून असलेल्या ह्या संपूर्ण साखळीत वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावतात. वनस्पती प्रकाश संश्लेषणातून, कार्बन डायॉक्साईड आणि पाणी ह्यापासून कर्बोदके (कार्बोहायड्रेट C6H12O6) म्हणजे साखर तयार करतात. ह्यातील जवळजवळ ४० ते ५०% साखर वनस्पती आपल्या मुळांवाटे सूक्ष्मजीवांना पुरवत असतात. त्यासोबत विशिष्ट प्रोटीन्स, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटकही पुरवतात. त्याला exudates म्हणतात. आपल्या घामासारखा हा एक स्राव. मुळांच्या टोकाकडून हा स्राव बाहेर पडतो. ह्याचं वैशिष्ट्य असं की, वनस्पतींना हा स्राव त्यांना जे अन्नघटक हवे आहेत त्याप्रमाणे बदलता येतो. हा स्राव विशिष्ट बॅक्टेरिया आणि बुरशी खातात.

त्यांची संख्या वाढते आणि मग त्यांना खाणारे प्रोटोझोआ (protozoa) आणि नीमॅटोड्स (nematods) तिथे येतात. ते बॅक्टेरिया आणि बुरशी खातात. त्यांना खाणारेही काही नीमॅटोड्स (nematods) आणि सूक्ष्मसंधीपाद (microarthropod) असतात मग त्यानंतर त्यांना खाणारे इतर सजीव अशी ही साखळी असते. ह्या नैसर्गिक रचनेत सर्व जीवांचं संतुलन राखलं जातं. ह्या सजीवांच्या विष्ठेमधून आवश्यक असलेली अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध होतात. तेही थेट मुळांच्या आजूबाजूला त्यांना शोषून घेता येऊ शकेल अशा अवस्थेत!

ह्या पूर्ण प्रक्रियेवर वनस्पतींचं नियंत्रण असतं. आश्चर्य म्हणजे, त्यांना हवे असलेले अन्नघटक हे मुळांवाटे सोडलेले स्राव (exudates) बदलून वनस्पती मिळवू शकतात. उदा. समजा वनस्पतींना फॉस्फरस (Phosphorus) हवं असेल तर त्या त्याच विशिष्ट जीवाणूंना आकर्षित करतात जे मातीच्या कणातील फॉस्फरस मिळवू शकतात. मग प्रोटोझोआ सारखे त्यांचे भक्षक जेंव्हा ह्या जीवाणूंना खातात, तेंव्हा त्यातलं बरंचसं ते विष्ठेवाटे मुळांच्या जवळ आणून सोडतात. वेगवेगळे अन्नघटक मिळवून देणारे वेगवेगळे जीवाणू. त्यामुळेच ह्या मुळांच्या अवतीभवतीच्या मातीत म्हणजे rhizosphere मधे जिवाणूंची प्रचंड विविधता असते. एवढी की जवळजवळ एक चमचा चांगल्या मातीत सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व माणसांपेक्षा जास्त जीवाणू असू शकतात.

वनस्पतींना आवश्यक असलेले सर्व महत्वाचे अन्नघटक वनस्पती ह्या मातीतल्या अन्नसाखळीतून मिळवतात. एका अर्थाने जीवाणूंची शेतीच वनस्पती करतात. सूक्ष्मजीवांसोबत हे त्यांचं सहजीवन गेली कोट्यवधी वर्षे सुरु आहे.

  • (क्रमश:)
  • संदर्भ:
  • Teaming with Microbes - जेफ लॉव्हेनफेल्स आणि वेन लुईस
  • Teaming with microbes - जेफ लॉव्हेनफेल्स

समीर अधिकारी
(शेतकरी, मोहरान फार्मस्, शहापूर)